हेतमेयरचे नाबाद अर्धशतक, चहलचे 4 बळी, स्टोईनिसचे प्रयत्न निष्फळ
वृत्तसंस्था/ मुंबई
शिमरॉन हेतमेयरच्या तुफानी नाबाद अर्धशतकानंतर सामनावीर यजुवेंद्र चहलने केलेल्या भेदक माऱयामुळे राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सवर केवळ 3 धावांनी रोमांचक विजय मिळविला. राजस्थानचा हा तिसरा विजय तर लखनौचा दुसरा पराभव आहे.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 6 बाद 165 धावा जमविल्या. हेतमेयरने 15 धावांवर मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत अखेरच्या टप्प्यात तुफानी फटकेबाजी करीत केवळ 36 चेंडूत 1 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा तडकावल्या. 23 चेंडूत 28 धावा करीत आर. अश्विनने त्याला चांगली दिल्यामुळे राजस्थानला मधली फळी कोसळल्यानंतर 6 बाद 165 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर लखनौ जायंट्सला 20 षटकांत 8 बाद 162 धावांवर रोखत राजस्थानने रोमांचक विजय साकार केला. स्टोईनिसने अखेरच्या टप्प्यात लखनौला विजयाच्या समीप आणले होते. पण कुलदीप सेनने शेवटच्या षटकात टाकलेले तीन निर्धाव चेंडू राजस्थानला विजयी करून गेले. स्टोईनिसने शेवटच्या दोन चेंडूवर चौकार व षटकार मारत 10 धावा वसूल केल्या. पण त्याचे प्रयत्न शेवटी अपुरे पडले. त्याने 17 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 38 धावा फटकावल्या तर अवेश खान 2 चेंडूत एका षटकारासह 7 धावांवर नाबाद राहिला.
बोल्टने टाकलेल्या डावातील पहिल्याच चेंडूवर लखनौचा कर्णधार केएल राहुल त्रिफळाचीत झाला तर दुसऱया चेंडूवर के. गौतम पायचीत झाला. होल्डरला 8 धावांवर प्रसिद्ध कृष्णाने बाद केल्यानंतर लखनौची स्थिती 3 बाद 14 अशी झाली होती. डी कॉक व दीपक हुडा यांनी चौथ्या गडय़ासाठी 38 धावांची भर घातली तरी ते बाद झाल्यानंतर लवकरच त्यांची स्थिती 7 बाद 102 झाली होती. पण स्टोईनिसने चमीरा व अवेश खान यांच्या साथीने संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यात तो थोडक्यात कमी पडला. चहल राजस्थानचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 41 धावांत 4 बळी मिळविले तर बोल्टने 30 धावांत 2 बळी टिपले.
बटलर-पडिक्कलची आक्रमक सलामी
वानखेडेवरील या सामन्यात जोस बटलर व देवदत्त पडिक्कल यांनी पहिल्या पाच षटकांत 42 धावांची भर घातली. पण त्यानंतर केवळ 15 चेंडूत तीन बळी गमविल्यामुळे 4 बाद 67 अशी त्यांची स्थिती झाली. हेतमेयर व आर. अश्विन यांनी डाव सावरताना 51 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. डावपेचाचा एक भाग म्हणून स्लॉग ओव्हर्समध्ये असताना राजस्थान रॉयल्स कॅम्पने अश्विनला निवृत्त केले. हेतमेयरने अखेरच्या टप्प्यात धावांचा वेग वाढवत जोरदार फटकेबाजी केली.
अवेश खानने आपल्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर लखनौला पहिले यश मिळवून देताना बटलरला 13 धावांवर त्रिफळाचीत केल्यानंतर कृष्णाप्पा गौतमने दोन झटपट गडी बाद करीत राजस्थानला अडचणीत आणले. होल्डरने जादा धावा दिल्या तरी त्याने दोन बळी मिळविले. रवी बिश्नोईला मात्र आज यश मिळू शकले नाही. त्याच्या चार षटकांत 29 धावा निघाल्या. शिवाय त्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर पडिक्कलला जीवदानही दिले. पडिक्कल धोकादायक फटके मारत होता आणि याच प्रयत्नात तो गौतमचा पहिल्याच चेंडूवरील बळी ठरला. संजू सॅमसनने दोन चांगले फटके मारले. मात्र होल्डरने त्याला 13 धावांवर पायचीत केले. हेतमेयरला नंतर 14 व्या षटकात कृणाल पंडय़ानेही जीवदान दिले. होल्डरने टाकलेल्या 18 व्या षटकात राजस्थानने एकूण 18 धावा वसूल केल्या.
संक्षिप्त धावफलक ः बटलर 13, पडिक्कल 29, सॅमसन 13, हेतमेयर नाबाद 59, अश्विन 28, होल्डर 2-50, गौतम 2-30, अवेश खान 1-31.
लखनौ सुपरजायंट्स 20 षटकांत 8 बाद 162 ः डी कॉक 32 चेंडूत 39, दीपक हुडा 25, कृणाल पंडय़ा 22, स्टोईनिस 17 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 38, चमीरा 13, चहल 4-41, बोल्ट 2-30, पी. कृष्णा 1-35, कुलदीप सेन 1-35.