ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे बुधवारी रात्री उशिराने कोरोनामुळे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. 1980 – 81 मध्ये ते राजस्थानचे मुख्यमंत्री होते. त्याशिवाय ते बिहार आणि हरियाणाचे राज्यपाल देखील होते.
त्यांच्या निधनानंतर राजस्थान सरकारने एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडकणार आहे. तसेच सर्व सरकारी कार्यालयांना सुटी असणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहाडिया यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
पहाडिया यांच्या निधनावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विटरवर म्हटले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाची बातमी खुपच दु:खद आहे. पहाडिया यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री म्हणून बराच काळ देशाची सेवा केली. ते देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. पहाडिया यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगातून सावरण्याची ताकद इश्वर देवो, तसेच पहाडिया यांच्या मृतात्म्यास शांती लाभो असेही गेहलोत यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री पहाडिया यांच्या निधनानंतर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राजस्थान काँग्रेसचे प्रबार अजय माकन आणि पीसीसी चीफ गोविंद सिंह डोटासरा यांच्यासह इतर नेत्यांनीही श्रद्धांजली वाहिली.