आयसीयूत वॉर्डबॉयकडून क्रूर कृत्य
@ वृत्तसंस्था /जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयातील वॉर्डबॉयला आयसीयूत व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्ण महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. मागील एक महिन्यात राजस्थानात अशाप्रकारची तिसरी घटना आहे. 2 मार्च रोजी अल्वरमध्ये पतीच्या विरोधात तक्रार नोंदविण्यास गेलेल्या महिलेवर सहाय्यक उपनिरीक्षकाने बलात्कार केला होता. तर 15 मार्च रोजी कोटा येथील एका अल्पवयीन मुलीवर 20 पेक्षा अधिक जणांनी बलात्कार केला होता.
जयपूरच्या रुग्णालयातील पीडिता व्हेंटिलेटरवर होती आणि तोंडात ऑक्सिजनची नळी होती. सोमवारी संध्याकाळी शस्त्रक्रिया झाली असल्याने पूर्ण शरीरात वेदना होत होत्या. अशा स्थितीतही महिलेने शक्य तितका प्रतिकार केला, पण क्रूरकर्मा असलेल्या वॉर्डबॉयला दया आली नाही. जयपूरच्या शैल्बी रुग्णालयात सोमवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिलेच्या पतीच्या तक्रारीच्या आधारावर आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
पीडित महिला आयसीयूत एकटीच होती. लैंगिक शोषणानंतर महिला रात्रभर रडत होती. सकाळी परिचारिकेकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता जवळच उभ्या असलेल्या आरोपीने हातवारे करून धमकी देत गप्प केले होते. काही वेळानंतर पती आल्यावर महिलेने हातखुणा करत घटनेविषयी सांगण्याचा प्रयत्न केला. पतीने गांभीर्य ओळखून तिच्या हाती कागद आणि पेन सोपविले. पीडितेने घडलेला पूर्ण प्रकार कागदावर उतरवला, त्यानंतर पतीने पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. आरोपीचे नाव खुशीराम गुर्जर आहे.
सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास
ही घटना अत्यंत गंभीर आहे. रुग्णालयात पोहोचलेल्या पोलीस पथकाने डय़ुटी चार्ट आणि सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारावर आरोपीची ओळख पटवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी ठावठिकाण्याच्या आधारावर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत अशी माहिती तपास अधिकारी पन्नालाल यांनी दिली आहे.