ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमधील खाजगी रुग्णालयात आणि लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारले जात होते. मात्र ही किंमत सामान्य जनतेला परवड नसल्याने हे दर रद्द करून नवीन दर आकारण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार आता राजस्थानमध्ये 2200 रुपये दर आकारण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, या निर्णयामुळे आता खाजगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केवळ 2 हजार 200 रुपयांमध्ये केली जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, राज्यात 20 राजकीय चिकित्सा संस्थांमध्ये कोरोनाची तपासणी निःशुल्क केली जात आहे. तसेच एनएबीएल मान्यताप्राप्त आयसीएमआरकडून मंजुरी देण्यात आलेल्या चार खाजगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली जात आहे. तसेच या निर्णयानंतर देखील खाजगी लॅब कडून अधिक दर आकारला गेल्यास संबधित लॅब वर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.