टी-20 क्रिकेटमध्ये एकेक खेळाडू लाख मोलाचा असतो आणि ज्यावेळी जागतिक क्रिकेटमधील एखाद्या अव्वल अष्टपैलू खेळाडूचा प्रश्न असेल तर आणखी लाख मोलाचा. राजस्थान रॉयल्सला मागील काही दिवसांपासून आपल्या ताफ्यातील अशाच एका अष्टपैलू (आणि महागडय़ा!) खेळाडूच्या उपलब्धतेबद्दल चिंता लागून राहिली आहे आणि तो म्हणजे अनुभवी इंग्लिशमन बेन स्टोक्स!
याच स्टोक्सने शनिवारपासून न्यूझीलंडमध्ये सराव सुरु केला असून त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला दिलासा मिळाला आहे.
वास्तविक, सध्याच्या घडीला बेन स्टोक्सला संयुक्त अरब अमिरातीत असणे आवश्यक होते. पण, तो आपल्या आजारी वडिलांवर उपचार सुरु असल्याने न्यूझीलंडमध्ये आहे. बेनचे वडील मेंदूच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. अर्थात, स्टोक्सने एकीकडे, त्यांच्यावर उपचार सुरु असताना दुसरीकडे, ख्राईस्टचर्चमध्ये सरावही सुरु केला आहे आणि यामुळे तो आपल्या ताफ्यात दाखल होऊ शकेल, अशी राजस्थान प्रँचायझीला अपेक्षा आहे. राजस्थानने बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.