आयपीएल साखळी सामन्यात दोन्ही संघ परस्परांची ताकद आजमावणार
मुंबई / वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंतचे सातत्य कायम राखले तर राजस्थान रॉयल्स व लखनौ सुपरजायंट्स या संघात आज (रविवार दि. 10) होणारी आयपीएल साखळी लढत ब्लॉकबस्टर ठरु शकते. आयपीएल पदार्पणवीर लखनौ सुपरजायंट्सने यंदा दणकेबाज सुरुवात केली असून पहिल्या 4 पैकी 3 सामने जिंकत गुणतालिकेत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. याचवेळी राजस्थान रॉयल्सचा संघ देखील उत्तम बहरात राहिला आहे. उभय संघातील ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ संघाला यंदा गुजरात टायटन्सविरुद्ध सलामी लढत निसटत्या फरकाने गमवावी लागली. पण, नंतर त्यांनी विद्यमान विजेत्या चेन्नई सुपरकिंग्स, सनरायजर्स हैदराबाद व बलाढय़ दिल्ली कॅपिटल्सला देखील धूळ चारण्याचा पराक्रम गाजवला.
केएल राहुलने नेतृत्वात उत्तम चुणूक दाखवली असून इव्हिन लुईस, दीपक हुडा व युवा फलंदाज आयुष बदोनी फलंदाजीत प्रभावी ठरत आले असल्याने हा संघ अधिक मजबूत झाला आहे. टायटन्सविरुद्ध पराभवातून लवकर सावरण्यासाठी विंडीज अष्टपैलू जेसॉन होल्डरचे आगमन या संघासाठी महत्त्वाचे ठरले. मागील लढतीत कॅपिटल्सला 6 गडी राखून नमवले असल्याने लखनौचे येथे मनोबल उंचावलेले असेल.
लखनौचा सलामीवीर क्विन्टॉन डी कॉकने दिल्लीच्या गोलंदाजांचा उत्तम फडशा पाडत 52 चेंडूत 80 धावांची आतषबाजी केली होती. शिवाय, बदोनी, कृणाल पंडय़ा यांनीही सातत्याने समयोचित योगदान दिले आहे. कृष्णप्पा गौतमचा दिल्लीविरुद्धचा किफायतशीर मारा निर्णायक ठरला होता. राहुलला यापूर्वी स्वस्तात बाद व्हावे लागले होते. येथे आजच्या लढतीत तो ही कसर भरुन काढण्यासाठी प्रयत्नशील असेल.
संभाव्य संघ
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार-यष्टीरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेतमेयर, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, रियान पराग, नॅथन कोल्टर-नाईल, देवदत्त पडिक्कल, नवदीप सैनी, करुण नायर, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, जेम्स नीशम, अनुनय सिंग, डॅरेल मिशेल, ध्रुव जुरेल, शुभम गरवाल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, ओबेड मकॉय, तेजस बरोका, केसी करिअप्पा.
लखनौ सुपरजायंट्स ः केएल राहुल (कर्णधार व यष्टीरक्षक), क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, इव्हिन लुईस, मार्कस स्टोईनिस, जेसॉन होल्डर, ऍन्डय़्रू टाय, काईल मेयर्स, अवेश खान, दुष्मंता चमीरा, रवि बिश्नोई, आयुष बदोनी, मनन वोहरा, कृष्णप्पा गौतम, शाहबाज नदीम, अंकित रजपूत, मयांक यादव, मोहसिन खान, कर्ण शर्मा.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
राजस्थान रॉयल्सचा संघ तिन्ही आघाडय़ांवर मजबूत
यष्टीरक्षक-कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू ताफ्यात असल्याने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर मजबूत राहिला आहे. राजस्थानला आरसीबीविरुद्ध पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी सनरायजर्स हैदराबाद व मुंबई इंडियन्सविरुद्ध अनुक्रमे 61 व 23 धावांनी विजय मिळवले आहेत.
मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून वाखाणला जाणारा जोस बटलर या संघात असून आरसीबीविरुद्ध त्याने 47 चेंडूत 70 धावांची आतषबाजी केली होती. साहजिकच, बटलरचा फॉर्म राजस्थानसाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे. याशिवाय, देवदत्त पडिक्कल व शिमरॉन हेतमेयर यांची चौफेर फटकेबाजीची क्षमता या संघाचे बलस्थान असेल. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन कोणत्याही गोलंदाजीची चिरफाड करण्यासाठी तत्पर असणार आहे.
जलद गोलंदाज नवदीप सैनी मागील काही सामन्यात महागडा ठरला असून गोलंदाजीत फारसे योगदान न दिलेल्या रियान परागला सहाव्या स्थानीच फलंदाजीला उतरवले जाईल का, हे पहावे लागेल. बटलर, हेतमेयर व ट्रेंट बोल्ट, असे तीन विदेशी खेळाडू खेळवणाऱया राजस्थान रॉयल्स संघाकडे अष्टपैलू जिम्मी नीशमचा पर्याय देखील उपलब्ध आहे.