दुबई : राजस्थान रॉयल्स व सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ यावेळच्या आयपीएलमध्ये अडचणीत असून दोन्ही संघांतील युवा खेळाडूंना आपापल्या संघाला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. गुरुवारी या दोन संघांत होणारा सामना दोघांसाठीही ‘जिंकायलाच हवा’ अशा स्वरूपाचा असून सायंकाळी 7.30 पासून हा सामना सुरू होईल.
संघातील वरिष्ठ खेळाडू अपयशी ठरल्यास सनरायजर्सच्या प्रियम गर्ग, अब्दुल समद आणि राजस्थानच्या कार्तिक त्यागी, रियान पराग या युवा खेळाडूंना चमक दाखवावी लागेल. आठ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत सनरायजर्स सध्या 9 सामन्यांत 6 गुण घेत शेवटून दुसऱया स्थानावर असून राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह त्यांच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे. रॉयल्सने आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सवर मोठा विजय मिळविल्याने त्यांनी सनरायजर्सला मागे टाकले आहे. सनरायजर्सला या सामन्यात हलकीशी चूकही महाग पडू शकते. कारण हा सामना गमविल्यास प्लेऑफमध्ये खेळण्याची त्यांची संधी हुकणार आहे. रॉयल्सला मात्र संघातील विदेशी खेळाडू आधीच्या सामन्याप्रमाणे प्रदर्शन करून संघाची विजयी दौड पुढे चालू ठेवतील, अशी आशा वाटते.
राजस्थानने दोन मोठे पराभव स्वीकारल्यानंतर त्यांची गाडी पुन्हा एकदा रूळावर आली असून सनरायजर्सपेक्षा त्यांची बाजू थोडीशी वरचढ आहे. सनरायजर्सला आधीच्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये केकेआरकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. रॉयल्सला देखील गुरुवारच्या सामन्यात पराभव परवडणारा नाही. तसे झाल्यास प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवणे त्यांना खूपच कठीण जाणार आहे. जोफ्रा आर्चर हा त्यांच्या गोलंदाजीचा कणा बनला असून मनगटी स्पिनर्स श्रेयस गोपाल व राहुल तेवातिया यांनी चेन्नईविरुद्ध मधल्या षटकात जबरदस्त गोलंदाजी केली होती. गुरुवारच्या सामन्यात याच कामगिरीची ते पुनरावृत्ती करतील, अशी आशा कर्णधार स्मिथ बाळगून आहे.
फलंदाजीत बटलरने आधीच्या सामन्यात शानदार खेळी केली. त्याचा खेळ पाहून स्मिथने दुय्यम भूमिका घेतली होती. मात्र आरआरला आघाडीवर भागीदारी रचण्यात सातत्य दाखवावे लागणार आहे. बटलरने उपयुक्त खेळी केली असली तरी आपल्या कामगिरीवर तो समाधानी नाही. मात्र आपल्या संघाने विजयाचा मार्ग धरलाय याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. मागील तीन सामने आम्ही जिंकायला हवे होते. पण त्यापैकी आम्ही एकच जिंकू शकलो. आता उर्वरित चार सामने आम्हाला जिंकावेच लागणार आहेत, असे बटलर म्हणाला. अव्वल चार संघ व उर्वरित चार यांच्यात खूपच अंतर असल्याचेही त्याने मान्य केले. अष्टपैलू बेन स्टोक्सने अद्याप त्याच्याकडून अपेक्षित असलेली कामगिरी केलेली नाही तर उथप्पा हा त्यांचा आतापर्यंतचा कच्चा दुवा ठरला आहे. त्यामुळे त्याच्या जागी पंजाबच्या मनन व्होराला आजमावून पाहिले जाऊ शकते. संजू सॅमसनचा हरवलेला फॉर्म यामुळेही राजस्थानची स्थिती नाजूक बनली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे त्याने सुरुवातीच्या सामन्यात जबरदस्त खेळ केला आणि नंतर हळूहळू त्याची घसरण होत गेली आहे.
सनरायजर्सला केकेआरविरुद्ध सुपरओव्हरमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागला असणार. पण या धक्क्यातून त्यांना लवकर बाहेर पडावे लागेल आणि आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर डावपेचांतही त्यांना बदल करावे लागतील. हा संघ फलंदाजांवर विशेषतः सुरुवातीच्या चौघांवर जास्त अवलंबून आहे. वॉर्नर, बेअरस्टो, मनीष पांडे, केन विल्यम्सन यांच्याकडून पुन्हा एकदा मोठय़ा खेळीची अपेक्षा केली जात आहे.