पोलीस तैनात, कोणतीही घटना घडल्यास प्रशासन जबाबदार
वार्ताहर /धामणे
शहर तसेच विविध भागांमध्ये पुतळा बसविण्याचे कटकारस्थान सुरू आहे. राजहंसगडावरही काही महाभागांनी पुतळा बसविण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती उघडकीस आली. त्यामुळे राजहंसगड परिसरातील शेकडो कार्यकर्ते राजहंसगडाच्या पायथ्याशी ठाण मांडून होते.
राजहंसगड, सुळगा-येळ्ळूर, देसूर, येळ्ळूर, वडगाव, शहापूर तसेच परिसरातून मोठय़ा संख्येने कार्यकर्ते राजहंसगड परिसरात जमा झाले. सर्वसामान्य जनता कोरोना संकटाचा सामना करत आहे. अशातच काही महाभागांनी राजहंसगडावर पुतळा उभारण्याचा प्रयत्न सुरू केला होता. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच हा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिवसरात्र पहारा ठेवला आहे.
शनिवारी जिल्हा पंचायत माजी सदस्य रमेश गोरल, ग्राम पंचायत माजी सदस्य राजू पावले, सतीश कुगजी, सतीश चव्हाण, संतोष मंडलिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रात्रभर पहारा देत होते. पोलीस अधिकारीही रात्री त्या ठिकाणी ठाण मांडून होते. आता यापुढे त्या ठिकाणी विविध शिवप्रेमी पहारा देणार आहेत. मात्र, या घटनेमुळे 15 ऑगस्ट रविवारच्या दिवशी राजहंसगडावर जाण्यास निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे पर्यटकांची निराशा झाली. श्रावणमास असल्याने राजहंसगडावरील सिद्धेश्वर मंदिरमध्ये मोठी गर्दी होत असते. या प्रकारामुळे भक्तांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सोमवारी हे मंदिर खुले करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.