वार्ताहर/ धामणे
राजहंस गडावर यंदा दसरोत्सव कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. येथील पंच कमिटीने राजहंस गडावरील सिद्धेश्वर मंदिरात प्रवेश बंदी केल्याचे जाहीर केल्याने राजहंसगड, नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, देसूर, सुळगा, येळ्ळूर, धामणे येथील भाविकांनी गडावर उत्सवाला उपस्थित राहण्याचे टाळल्याचे दिसून आले.
प्रतिवर्षाप्रमाणे राजहंसगड गावातील ईरय्या बुर्लकट्टी यांच्या घरातून पालखीत प्रतिष्ठापना करून गावातील सिद्धेश्वर मंदिरात पालखीचे पूजन घटस्थापने दिवशी सवाद्या टाळ मृदंगाच्या गजरात देवस्की पंच व भाविकांच्या उपस्थितीत पालखी राजहंसगड किल्ल्यावर सिद्धेश्वर मंदिरात ठेऊन 9 दिवस जागर करण्यात आला. यामध्ये राजहंसगड, बेळगावातील भजनी मंडळे, यरमाळ येथील हनुमान शिव भजनी मंडळाने भाग घेतला होता. त्याप्रमाणे दररोज रात्रीच्या प्रसादाची सेवा रवि लोखंडे, परशराम अनगोळकर, बसवंत पवार, महेश कुंडेकर, गणपत जाधव, अडव्याप्पा हिरेमठ यांनी स्वखर्चाने केले.
रविवारी दि. 25 रोजी दुपारी 4 वाजता गडावरील सिद्धेश्वर मंदिरातील देवाची पालखी टाळ मृदंगाच्या तालात राजहंसगडाच्या पायथ्याशी असलेल्या तलावाशेजारी ऐतिहासिक ठिकाणी सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ही पालखी गावात सर्व मंदिरांना प्रदक्षिणा घालून येथील सिद्धेश्वर मंदिरात आरतीनंतर उत्सवाची सांगता झाली. हा उत्सव पार पाडण्यासाठी पंच कमिटीचे सदस्य सिद्धाप्पा छत्रे, भाऊ पवार, धाकलू इंगळे, रामचंद्र हावळ, परशराम अनगोळकर, बसवंत पवार, जयराम कुंडेकर, सुरेश थोरवत, सिद्धाप्पा बुर्लकटी यांनी उत्तम सेवा बजावली.