उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सन्मान
राजापूर
शासनाच्या ‘माझी वसुंधरा योजनें’तर्गत कोकण विभागातून सर्वोत्तम कामगिरीबद्दल अणसुरे ग्रामपंचायतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. गावच्या जैवविविधतेवर आधारित वेबसाईट बनवणारी देशातील पहिली ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीला तब्बल 1 कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.अणसुरे ग्रामपंचायतीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबईत नरिमन पॉईंट टाटा थिएटर येथे भव्य सन्मान व पारितोषिक प्रदान सोहळा नुकताच पार पडला.
रत्नागिरी जिल्हय़ात विविध मानाचे पुरस्कार प्राप्त अणसुरे ग्रामपंचायतीला यावेळी सन्मानपत्र देत सन्मान करण्यात आला. यावेळी 1 कोटी रुपये बक्षीस जाहीर झाले असून रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे बक्षिसाची रक्कम ग्रामपंचायतीकड़े जमा होणार आहे. देशात जैवविविधतेवर आधारित बेबसाईट बनवणारी अणसुरे ही एकमेव ग्रामपंचायत ठरली असून या बेबसाईटचे 22 मे 2022 रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामार्फत आयोजित पुण्यातील एका शानदार कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले होते. अणसुरे ग्रामपंचायतीने ‘अणसुरे जैवविविधता’ या नावाने हे संकेतस्थळ तयार केले असून यावर स्थानिक वृक्ष, वेलवर्गीय व अन्य वनस्पती, मासे, कीटक, पक्षी, इत्यादी जैवविविधता प्रकारांची फोटोसहित माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. गावामध्ये प्राणी-पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास, देवराईबाबत माहितीपर नोंदी आहेत