राजापूर
मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली पॉवरहाऊससमोर मालवाहू कंटेनर व अल्टो कार (एमएच07-क्यू 2838) यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत कारचालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली. दिलीप भिकलिंग जंगम (65, कुडाळ विठ्ठलवाडी) असे मृताचे नाव आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कुडाळ विठ्ठलवाडी येथील रहिवासी व खारलॅन्ड विभागातील माजी अधिकारी दिलीप भिकलिंग जंगम पत्नी दिपाली (54) यांच्यासह गुरूवारी लांजा येथे विवाह समारंभासाठी आले होते. शुक्रवारी परतत असताना राजापूर पॉवरहाऊससमोर हा अपघात घडला. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला ओव्हरेटक करताना समोरून मुंबईच्या दिशेने येणाऱया कंटेनरवर ते आदळले. यामध्ये दिलीप यांचा मृत्यू झाला असून पत्नीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.