राजापूर
शहरातील चव्हाणवाडी येथून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असलेला 40 वर्षीय तरुण रानतळे येथील सडय़ावर मृतावस्थेत आढळला. दरम्यान या मृत तरुणाच्या चेहरा व डोक्यावर मारहाणीच्या खुणा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. राजेश वसंत चव्हाण (40, रा. चव्हाणवाडी, राजापूर) असे मृताचे नाव आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाणवाडी येथील सलून व्यावसायिक राजेश चव्हाण हे सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कोठेही आढळले नाहीत. अखेर मंगळवारी त्याच्या पत्नीने सकाळी राजापूर पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास केला असता राजेश याचे शेवटचे मोबाईल लोकेशन रानतळे येथे मिळाल्याने रानतळे परिसरात शोध घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱया रस्त्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर सडय़ावर त्याचा मृतदेह आढळला.
या घटनेची खबर मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान राजेशच्या डोक्याच्या मागच्या बाजूला तसेच चेहऱयावर जोरदार मार लागला होता. चेहऱया रक्ताने माखलेल्या स्थितीत होता. तसेच राजेशच्या मृतदेहापासून काही अंतरावर त्याचा मोबाईल फोडलेल्या अवस्थेत आढळला. तर मृतदेहाजवळ ग्लास व खाद्यपदार्थही आढळून आले. त्यामुळे राजेश याचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रानतळे येथील वस्तीलगत हा प्रकार घडल्याने राजापुरात खळबळ उडाली आहे..
अनेकांची रानतळेत धाव
राजेश चव्हाण हा तरुण सलून व्यावसायिक म्हणून परिचित होता. पूर्वी जकातनाका येथे त्याचे सलून होते. आठ दिवसांपूर्वीच त्याने राजापूर ग्रामीण रुग्णालयासमोरील गाळय़ांमध्ये नवीन सलून दुकान सुरू केले होते. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच अनेकांनी रानतळे येथे धाव घेतली.