प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापूरमध्ये 70 (ब)च्या दाव्याचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने देण्यासाठी लाच घेणारा पुरवठा निरीक्षण अधिकारी अशोक शेळके रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळय़ात अडकला. तक्रारदार यांच्याकडे 10,000 ते 15,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10,000 रूपये लाच रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्यावतीने बुधवारी करण्यात आली.
अशोक गजानन शेळके (58) पुरवठा निरीक्षण अधिकारी, पदभार निवासी नायब तहसीलदार राजापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, वर्ग-2 येथे कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला 70 ब च्या दाव्याचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी शेळके यांने तक्रारदार यांच्याकडे 10,000 ते 15,000 रुपये लाचेची मागणी 4 फेब्रुवारी रोजी केली होती. पण तडजोडीअंती 10,000 रूपये लाच रक्कम स्वीकारताना शेळके याला 16 फेब्रुवारी रोजी रंगेहाथ पकडण्यात येऊन ही रक्कमही त्याच्याकडून कारवाई पथकाने हस्तगत केली.
ही कारवाई रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षक अधिकारी- पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सापळा पथक पो. नि. प्रवीण ताटे, स. फौ. संदीप ओगले, पो. हे. संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पो. शि. हेमंत पवार, राजेश गावकर यांच्या पथकाने केली. या कारवाईसाठी मार्गदर्शक अधिकारी पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे, अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली.
जिह्यातील नागरिकांना आवाहन
रत्नागिरी जिह्यातील सर्व नागरिकांना कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने एखाद्या खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण (9823233044), पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे (8055034343) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.