वार्ताहर/ राजापूर
राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. यामध्ये केळवली गणाच्या सदस्या प्रमिला कानडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती निवडीनंतर आमदार राजन साळवी यांच्यासह सेना पदाधिकाऱयांनी कानडे यांना शुभेच्छा दिल्या.
राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता असून बारापैकी 10 सदस्य सेनेचे आहेत. शेवटच्या अडीच वर्षासाठी राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला राखीव गटासाठी आरक्षित असून त्याची सव्वा वर्षे पार पडली आहेत. सेनेकडून सभापती व उपसभापतीपदासाठी समान संधी देण्याचे धोरण ठरवण्यात आल्याने सभापती व उपसभापती पदाचा कार्यकाल सव्वा वर्षाऐवजी नऊ महिन्यांचा करण्यात आला. त्यामुळे यापुर्वीच्या सभापती विशाखा लाड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली.
सभापतीपदासाठी केळवलीच्या सदस्या प्रमिला कानडे व कोंडय़ेतर्फे सौंदळच्या सदस्या करूणा कदम यांच्यात चुरस होती. मात्र शिवसेनेकडून कानडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रवीण खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूकीत कानडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती कानडे यांचे शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी आमदार राजन साळवी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, प्रभारी सभापती प्रकाश गुरव, महिला उपजिल्हा संघटक दुर्वा तावडे, तालुका महिला आघाडी योगिता साळवी, युवासेना उपजिल्हा अधिकारी विभागप्रमुख संतोष हातणकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, नरेश शेलार, कमलाकर कदम, जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले, भारती सरवणकर, सोनम बावकर, पंचायत समिती गटनेते अभिजित तेली, प्रसाद मोहरकर यांच्यासह सेना पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.