राजापूर
शहरातील रानतळे येथील सडय़ावर संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या राजेश वसंत चव्हाण (40, रा. चव्हाणवाडी राजापूर) याच्या खुनाचा अवघ्या बारा तासाच्या आत छडा लावण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी (25, रा. उत्तरप्रदेश, सध्या राजापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
या बाबत राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाणवाडी राजेश चव्हाण हे सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱया रस्त्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर सडय़ावर त्याचा मृतदेह आढळून आला. राजेश याच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याने त्याचा घातपात झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्यामुळे राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर व त्यांच्या सहकाऱयांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.
राजेश हा सोमवारी रात्री अन्य एका इसमासोबत रिक्षातून रानतळे येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासकार्य राबवत संशयित म्हणून रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी याला बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हय़ाची कबुली दिल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. रूकसार हा राजापूर शहरातील एका सलूनमध्ये कामाला आहे. रूकसार व राजेश हे काही काळ एकत्र सलूनमध्ये काम करत होते. दरम्यान राजेशने रूकसार याला ‘अश्लिल व्हीडीओ माझ्या मोबाईलमध्ये असून 30 हजार रूपये दे, अन्यथा मी ते व्हीडिओ व्हायरल करेन’ अशी धमकी दिली होती.
याचा राग मनात धरून रूकसार याने सोमवारी सायंकाळी राजेश याला रानतळे येथे नेले. त्या ठिकाणी राजेश याने दारू पिल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केल्याचे पोलीस जबाबात सांगितल्याचे राजापूर पोलिसांनी सांगितले. राजापूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच खुनाचा छडा लावल्याने कौतुक होत आहे. या कामी राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे, वेंगुर्लेकर यांच्यासह सर्व कर्मचाऱयांनी मेहनत घेतली.