कुटुंबाची गुजराण करणे अवघड झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
प्रतिनिधी / मोहोळ
एसटीचा राजीनामा दिलेल्या वाहकाने कुटुंबाची गुजराण करणे अवघड जात असल्याने शेतातील झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळासाहेब सिद्धेश्वर परबतराव (वय 55) असे आत्महत्या केलेल्या एसटी वाहकाचे नाव आहे.
सोलापूर एसटीमध्ये वाहक असणारे बाळासाहेब परबतराव यांचे निलंबन झाले होते. गेल्या दीड वर्षापासून काम नाही, पगार नाही त्यामुळे कुटुंबाची गुजराण करणे अवघड झाल्याने नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. बाळासाहेब यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे समजू शकले नाही. बाळासाहेब परबतराव यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. घटनास्थळी पोलीस नाईक लोबो चव्हाण यांनी भेट दिली. मोहोळ पोलिसांमध्ये ही आत्महत्या दारूच्या नशेत केल्याची नोंद झाली आहे.
परंतु, बाळासाहेब यांचा मृतदेह ज्या फांदीला लटकला होता, त्याची फांदी जमिनीपासून कमी उंचीवर होती आणि मृतदेह जमिनीवर आडवा पडला होता, तसेच पायातील चप्पलाही तशाच होत्या. त्यामुळे त्यांची आत्महत्या आहे किंवा काही घातपात झाला आहे याबाबत परिसरामध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. पोलिसांनी आकस्मिक आत्महत्या अशी नोंद केली आहे. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोबो चव्हाण करत आहेत.