वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणारा माजी संघसहकारी वासिम जाफरला महान फिरकीपटू अनिल कुंबळेने पाठबळ दर्शवले आहे. जाफरने संघनिवडीत हस्तक्षेप होत असल्याच्या कारणावरुन दोनच दिवसांपूर्वी उत्तराखंड प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उत्तराखंड व्यवस्थापनाने वासिम जाफर खेळाडू निवडताना धार्मिक भेद करत असे, असा ठपका ठेवला आहे. जाफरने मात्र सदर आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले.
‘माझे पूर्ण पाठबळ वासिमला असेल. दुर्दैवाने त्याचे प्रशिक्षण लाभणार नाही, हे खेळाडूंचे दुर्दैव’, असे कुंबळे ट्वीटर हँडलवर म्हणाले. 42 वर्षीय जाफरने भारतातर्फे 31 कसोटी खेळले असून प्रथमश्रेणी क्रिकेटमधील अनुभवी खेळाडूंमध्ये त्याचा प्राधान्याने समावेश होतो.
‘माझा कल इक्बाल अब्दुल्लाकडे अधिक होता, असा त्यांचा ठपका होता. इक्बाल अब्दुल्लाला कर्णधार करण्याचा माझा प्रयत्न होता, या त्यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही. संघाच्या प्रशिक्षणावेळी मी काही मौलवींना बोलावले होते, हा ठपकाही चुकीचा आहे. मौलवी बायो-बबलमध्ये आले आणि त्यांनी नमाज पठण केले, असे त्यांचे मत आहे. पण, मी हे स्पष्ट करु इच्छितो की, मौलवी, मौलाना दोन किंवा तीन शुक्रवारी डेहराढूनमध्ये स्वतः शिबिरात आले होते आणि मी त्यांना अजिबात बोलावले नव्हते’, असे जाफरने ट्वीट करत आपली बाजू मांडली.
‘मी कर्णधार म्हणून जय बिश्तची शिफारस केली होती. पण, उत्तराखंड संघटनेनेच इक्बालला पसंती दिली’, असा दावा जाफरने येथे केला. वासिम जाफरला जून 2020 मध्ये उत्तराखंड राज्य संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त केले गेले होते. त्यावेळी त्याने 1 वर्षाचा करार केला होता. अलीकडेच संपन्न झालेल्या सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत उत्तराखंडला 5 पैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला.