स्व. किशोरीताई हळदणकर स्मृती प्रितर्थ सहावी महिला संगीत नाटय़स्पर्धा : कोरानाकाळात रसिकांना 14 संगीत नाटकांची मेजवानी
प्रतिनिधी / फोंडा
नाटय़ स्पर्धातून नवीन नाटके रंगमंचावर येणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन होतकरू कलाकार, दिग्दर्शक किंवा संस्थांनी पुढाकार घ्यावा. यापुढे कुठल्याही संस्थेने नवीन कोरे नाटक कला मंदिरच्या स्पर्धेत सादरीकण केल्यास त्या नाटकांसाठी आलेला अर्धा खर्च प्रोत्साहनरूपाने राजीव कला मंदिरतर्फे उचलण्यात येणार असल्याची घोषणा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केली.
राजीव कला मंदिरतर्फे स्व. किशोरीताई हळदणकर स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या सहाव्या अखिल गोवा महिला संगीत नाटय़ स्पर्धेच्या काल बुधवारी झालेल्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन सोहळयाला प्रमुख पाहूणे म्हणून नाटय़कलाकार महानंदा आमोणकर, उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर, कला मंदिरचे सदस्य सचिव एलेक्सीयो वाझ, संचालक गिरीश वेळगेकर, किरण नाईक, जुझे गोयीस, उदय तिळवे, महेश शिलकर, सुचिता नार्वेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ नाटयकलाकार महानंदा आमोणकर यांनी स्पर्धेत सहभागी होणाऱया महिला कलाकारांना मान्यवरांची कौतुकाची थाप व रसिकांचे प्रात्साहन मिळणे गरजेचे असल्याचे मत मांडले. स्पर्धेत एकूण 14 संस्थांनी सहभाग घेतलेला आहे. स्पर्धेचा 19 जानेवारी रोजी समारोप होणार आहे. स्पर्धेला परीक्षक म्हणून मंगला श्रीपाद जांभळे, प्रचला आमोणकर, निवेदिता पुणेकर काम पाहणार आहेत.
आज गुरूवार 7 जाने रोजी केरी येथील विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळातर्फे सं. शारदा चे सादरीकरण होणार आहे. शुक्रवार 8 रोजी साखळी येथील भूमी क्रिएशन गृहनिर्माण वसाहत यांचे सं. आनंद मठी, शनिवार 9 रोजी सांतआंद्रे महिला मंडळ मंडूर सं. ययाती आणि देवयानी, रविवार 10 रोजी म्हार्दोळ येथील गुरूकृपा सांस्कृति संस्थेतर्फे सं. सौभद्र, सोमवार 11 रोजी साई कला मंडळ सांगोल्डातर्फे सं. संशयकल्लोळ, मंगळवार 12 रोजी श्री देवी माऊली सांस्कृतिक मंडळ मेणकुरे डिचोलीतर्फे सं. गुरूदक्षिणा, बुधवार 13 रोजी सिद्धारूढ क्रिएशन आडपई दुर्भाटतर्फे सं. अयोध्येचा ध्वजदंड, गुरूवार 14 रोजी स्वर सत्तरी होंडातर्फे सं. मत्सगंधा, शुक्रवार 15 रोजी अभिनव कला थिएटर मांद्रतर्फे सं. ययाती व देवयानी, शनिवार 16 रोजी श्री पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा यांचे सं. जय जय गौरीशंकर, रविवार 17 रोजी महालक्ष्मी महिला मंडळ आमोणा यांचे सं. अमृत मोहिनी, सोमवार 18 रोजी मडकई वुमन असोसिएशनतर्फे सं. ब्रह्मतेज, मंगळवार 19 रोजी सिद्धीविनायक महिला भजनी मंडळ मये यांच्या सं. राम जन्मला ग सखे या नाटकाच्या सादरीकरणाने स्पर्धेचा समारोप होईल.
सामाजिक अंतर पाळत आसन व्यवस्था
महामारीच्या काळातही राजीव गांधी कला मंदिरतर्फे आपले सर्व उपक्रम व स्पर्धा सुरळीतपणे सुरू ठेवण्यामागे कला मंदिरच्या कर्मचाऱयाचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या नियम पाळत आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच सभागृहात फक्त 200 जणांना समावून घेण्यात येणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी केले. सुचिता नार्वेकर यांनी पाहुण्यांचा व परीक्षकांचा अल्प परीचय केला. सुत्रसंचालन गौरी कामत यांनी केले. महेश शिलकर यांनी आभार मानले.