गोवा कला अकादमीतर्फे आयोजन
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
गोवा कला अकादमी आयोजित 41 व्या सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोहाची शानदार सुरूवात फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात शुक्रवारी झाली. या समारोहाचे औपचारीक उद्घाटन गोवा कला अकादमीचे सदस्य सचिव विनेश आर्लेकर, माजी सदस्य सचिव तसेच ग्रामिण विकास यंत्रणेचे संचालक प्रवीण बरड, कला अकादमीच्या शासकीय संचालक फ्रान्सकिना ऑलव्हेरा व संगीत विभागाचे संचालक प्रेमानंद आमोणकर यांच्याहस्ते दिपप्रज्ज्वलनाने झाली.
समारोहातील पहिली मैफल गोव्याच्या प्रथितयश गायिका रितीषा चद्रकांत वेर्णेकर हिच्या श्रवणीय मैफलीने झाली. तिने ताल तिलवाडा मधील विलंबित मध्यलयीत राग ‘श्री’तीला ‘वारी जाऊ रे सावरीया तुम’ ही प्रचलित बंदीश पेश केली. श्री या सायंकालीन पुर्वी थाटाच्या रागाचा तिने शिस्तबद्ध विस्तर केला. रागोपयुक्त स्वरलगाव, मनोहारी बढत यामुळे तिचे गाणे रंगत गेले. उचित बोलताना आणि सफाईदार तानबाजी यामुळे शास्त्रिय संगीताला योग्य असलेल्या तिच्या कंठाची ग्वाही तिच्या या सादरीकरणातून मिळाली. त्यानंतर ‘चलो रे माई रामसिया दरसनको’ ही तीनतालातील द्रुत त्यानी समरसतेने पेश केली. लयीच्या अंगाने केलेला विस्तार आणि सुरांच्या वेध घेत केलेली प्रभावी मांडणी हे तिच्या गाण्याचे वैशिष्टय़ होते. आपल्या मैफलिच्या शेवटी कल्याण थाटातील छायानट या संपुर्ण जातीच्या रागातील छोटा ख्याल गाऊन तिने आपली मैफल आटोपती घेतली. तिला संवादिनीवर प्रसाद गांवस यानी तर तबल्यावर स्वप्नील मांद्रेकर यांनी समर्पक साथसंगत केली. या समारोहाला प्रेक्षकांची उपस्थिती कमी होती. मात्र दर्दी रसिक सभागृहामध्ये कलाकारांना प्रोत्साहन देत होते. दुसऱया सत्रात बडोदा येथील ख्यातनाम गितारवादक दिपक क्षिरसागर तर शेवटच्या सत्रात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या पुणे येथील त्यांच्या शिष्या सुप्रसिद्ध गायिका आरती अकलीकर यांचे गायन झाले. आज शनिवार 15 रोजी 10.30 वा. मुंबई येथील प्रसिद्ध गायक पं. व्यकटेशकुमार व पं. विनायक थोरवी यांचे शिष्य धनंजय हेगडे यांचे गायन दुपारी 12 वा. पुणे येथील सतारवादक शकीर खान यांचे सतारवादन सायंकाळी 4 वा. गोमंतकीय कलाकार सोनिक वेलिंगकर यांचे बासरीवादन सायंकाळी 5.15 वा. दिल्ली येथील प्रशांत मलीक व निशांत मलीक यांची धृपद गायकीची जुगलबंदी 6.30 वा. संगीता कट्टी कुलकर्णी, बंगळूर यांचे गायन तर आजच्या शेवटच्या सत्रात मुंबई येथील पं. योगेश सम्सी, स्वप्नील भिसे व पं. चन्द्रशेखर गांधी या यत्रीचे तबलावादन होईल.