मेहुल चोक्सी, झाकिर नाईक, राणा कपूरकडून मिळाला निधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपने राजीव गांधी फौंडेशनच्या वित्तपुरवठय़ाबाबत धक्कादायक दावे केले अहेत. राजीव गांधी फौंडेशनला घोटाळय़ाचा आरोपी असलेल्या मेहुल चोक्सीच्या कंपन्यांकडून देणगी मिळत होती. चोक्सी हा पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. फरार आरोपी झाकिर नाईक, येस बँकेचे राणा कपूर आणि जिग्नेश शाह यांनीही फौंडेशनला पैसा पुरविला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.
मेहुल चोक्सीच्या नावावर गीतांजली समूह आहे. या समुहाच्या अंतर्गत मेसर्स नवीराज इस्टेट्स ही कंपनी येते. या कंपनीने 29 ऑगस्ट 2014 रोजी राजीव गांधी फौंडेशनला धनादेशाद्वारे 10 लाख रुपयांची देणगी दिली होती. राजीव गांधी फौंडेशनला येस बँकेकडून 9.45 लाख रुपये मिळाले आहेत. हा राणा कपूरचा पैसा नव्हता, परंतु रक्कम येस बँकेमधून राजीव गांधी फौंडेशनला हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे.
एफटीआयएलकडून मोठी देणगी
भाजप नेत्याने तिसरे नाव जिग्नेश शाह याचे घेतले आहे. जिग्नेश शाह एनएसईएल घोटाळय़ासाठी कुख्यात आहे. एनएसईएलच्या विरोधात पीएमएलएचा खटला सुरू आहे. एफटीआयएलने फौंडेशनला 27 ऑक्टोबर 2011 रोजी 50 लाख रुपये दिले होते. जिग्नेश शाह आणि एफटीआयएलने 5,600 कोटी रुपयांचा घोटाळा केला असून यातील मोठा हिस्सा राजीव गांधी फौंडेशनला मिळाल्याचा दावा पात्रा यांनी केला आहे.
आयआरएफकडूनही देणगी
फरार गुन्हेगार झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फौंडेशनने 8 जुलै 2011 रोजी 50 लाख रुपये राजीव गांधी फौंडेशनला दिले होते. ज्या बँक खात्यातून ही रक्कम देण्यात आली, ते पीएमएलए अंतर्गत गोठविण्यात आले आहे. चोरी पकडण्यात आल्यावर फौंडेशनने ही रक्कम त्याच बँकेच्या अन्य खात्यात हस्तांतरित केल्याचे पात्रा यांनी म्हटले आहे.