ऑनलाईन टीम / वेल्लोर :
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन हिने सोमवारी रात्री तामिळनाडूमधील वेल्लोर कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केला. नलिनी मागील 29 वर्षांपासून वेल्लोर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
कारागृहात नलिनीचं एका कैद्यासोबत भांडण झाले होते. त्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे. मात्र, यामागचे खरे कारण समोर येणे आवश्यक आहे. त्यामुळे नलिनीच्या पतीने तिला दुसऱ्या कारागृहात हलविण्यात यावे, अशी मागणी वकिलांकडे केली आहे.
राजीव गांधी हत्या प्रकरणात नलिनी आणि तिच्या पतीसह 7 जणांना विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या सर्वांना फाशीची शिक्षा झाली होती. 24 एप्रिल 2000 साली त्यांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत झाले.