प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे माजी सभापती, माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काल मंगळवारी शपथग्रहण केले. राजधानी शिमला येथील राजभवनात त्यांना शपथ देण्यात आली. त्यावेळी त्यांनी हिमाचलची खासियत असलेली टोपी परिधान केली होती. त्यांनी हिंदी भाषेतून शपथ घेतली.
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवी विजयकुमार मलिमठ यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे 28 वे राज्यपाल ठरले आहेत. तेथील मुख्यमंत्री जयराम ठाकूर व इतर मंत्रीगण यावेळी उपस्थित होते.
शपथ घेण्यापूर्वी आर्लेकर यांच्या राज्यपालपदाच्या नियुक्तीचा राष्ट्रपतींचा आदेश वाचून दाखविण्यात आला. 6 जुलै रोजी हा आदेश जारी करण्यात आला होता. तेथील माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांचे निधन झाल्यामुळे व तीन दिवस दुखवटा पाळण्यात आल्यामुळे आर्लेकरांचा शपथविधी दुखवटा संपल्यानंतर करण्यात आला.