प्रतिनिधी /तिसवाडी
पुंभारजुवे मतदारसंघातील समाजसेवक तथा नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले राजेश फळदेसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. खोर्ली येथील स्वर्णम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवस सोहळय़ात कुंभारजुवे मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते, चाहते, गोव्यातील चाहते, मित्र, नातेवाईक, शुभचिंतकांनी उपस्थिती लावून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच येत्या विधानसभा निवणुकीसाठीही त्यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला राजेश फळदेसाई यांच्या पत्नी रिमा, मुलगा राहूल, मुलगी रूषाली यांच्यासह सुमारे चार हजारजणांच्या उपस्थितीत फळदेसाई यांनी केक कापला. त्यानंतर आलेल्या प्रत्येकांनी फळदेसाई या व्यासपीठावर येऊन शुभेच्छा व पुष्पगुच्छ भेट दिले.
दिवाडी बेटावरील दोन्ही ग्रामपंचायत क्षेत्रासह ओल्ड गोवा, खोर्ली, करमळी, कुंभारजुवे, सांत इस्तेव पंचायत क्षेत्रातील चाहत्यांची, त्यांच्या समर्थकांची यावेळी उपस्थिती होती. शुभेच्छा देणाऱयांमध्ये युवकांबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या लक्षणीय होती.
यावेळी बोलताना राजेश फळदेसाई म्हणाले की आपण माझ्यावर प्रेम करुन जी एवढय़ा मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली आहे, ती पाहून आपण भारावून गेलो आहे. आपले हे प्रेम असे आपणास सतत मिळत राहू द्यावे. आपण तसे फार कुणाला बोलावले नव्हते, तरीही कार्यकर्ते, हितचितक एवढय़ा प्रेमाने आले त्यामुळे आपण खराच भाग्यवान समजतो, असे ते म्हणाले.
लोकांच्या मनात आपण आहे. लोकांना आपण हवा आहे, हेच यावरुन सिद्ध होते. मुले, महिला, पुरुष अख्खी कुटुंबे घर बंद करुन आपल्या शुभेच्छा देण्यासाठी आले. लोकांनी मला दिलेला हा मोठा मान आहे. याला प्रेमाशिवाय आणखी काय म्हणावे असे सांगून हे प्रेम असेच कायम असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.