प्रतिनिधी/ पणजी
राज्यात आज जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार असल्याने पोलिसांना शुक्रवारी रात्री पासूनच विविध मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले आहे.
आज जिल्हा पंचायत निवडणुकासाठी मतदान होणार आहे. नंतर 15 रोजी मतमोजणी होणार आहे. पुढील तीन दिवस पोलिस यंत्रणा सुरक्षा व्यवस्थेच्या कामात व्यस्त असणार आहे. 19 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठीही नियोजन केले जात आहे. 19 डिसेंबर रोजी दुपारी राष्ट्रपती गोव्यात दाखल होतील नंतर येथील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली वाहून ते कांपाल येथे आयोजित केलेल्य मुख्य कार्यक्रमात सहभागी होतील. दरम्यान ते राजभवनावरही जाणार आहेत. दुसऱया दिवशी दुपारी ते पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
डिसेंबर महिनाभर राज्य पातळीवर तसेच अन्य ठिकाणी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याच्या नियोजनासाठी पोलिसांची धावपळ सुरु झाली आहे. नियमित पोलीस अधिकाऱयांच्या बैठका घेतल्या जात आहेत. जिल्हाधिकाऱयांसोबतही बैठका होत आहेत.
डिसेंबर महिन्यात होणाऱया कार्यक्रमांची सुरुवात ओल्ड गोवा फेस्तापासून होत असते. नाताळ निमित्त होणारे कार्यक्रम, तसेच 31 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. यावर्षी या साऱया कार्यक्रमात आणखी भर म्हणजे यंदा डिसेंबर महिन्यातच जिल्हा पंचायत निवडणुका होत आहेत. तसेच गोवा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. या साऱया कार्यक्रमांमुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. वाहतूक पोलीस विभाग, एटीएस, सीआयडी व इतर सर्व विभागातील पोलीस कर्मचारी महिनाभर व्यस्त रहाणार आहेत. पोलीस कर्मचाऱयांना सुट्टीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.