प्रतिनिधी/ पणजी
इ.स. 2020 ला बायबाय करीत तमाम गोमंतकीय जनतेने मध्यरात्रौ 11 वा. 59 मिनिटानंतर नूतन 2021 वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नवे वर्ष हे निवडणूक वर्ष आहे. त्याचबरोबर 10 हजार सरकारी नोकऱयांचे आहे. वर्षाअखेरीस निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असेल. फेब्रु. 2022 मध्ये निवडणुका होणार असल्या तरी त्याची तयारी आजपासून राज्यातील राजकीय पक्ष सुरू करीत आहेत. नवे वर्ष हे कोरोनामुक्त राहिल, असा संकल्प तमाम गोमंतकीय जनतेने सोडला आहे.
राज्यातील जनतेने मध्यरात्रौ 11 वा. 59 मिनिटानंतर येणाऱया प्रत्येक सेकंदाने वाट पहात पहात नूतन वर्षाचे स्वागत 11-59-59 वा. केले. ख्रिस्ती धर्मात या नूतन वर्षाला धार्मिक महत्वही आहे. त्यामुळेच मध्यरात्रौ प्रार्थना झाल्या आणि चर्चच्या घंटांचा मंजुळ नाद 11 वा. 59 मिनिटानंतर सुरू झाला. चर्चच्या फादर्सनी नूतनवर्ष सुरू झाल्याचे जाहीर केले.
समुद्रकिनाऱयांवर पर्यटकांची एकच गर्दी
नूतन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात देशाच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांनी राज्यातील समुद्र किनाऱयांवर एकच गर्दी केली होती. यावर्षी सार्वजनिक नृत्य रजनींवर बंदी असल्याने समुद्रकिनारी जनलेल्या पर्यटकांनी मध्यरात्रीच्या दरम्यान नूतन वर्षाचे स्वागत जल्लोषात केले.
अनेक ठिकाणी दारूकामाची आतषबाजीही
अनेक गोमंतकीयांनी छोटे छोटे गट करून विविध ठिकाणी आपल्या मित्रमैत्रिणींसमवेत नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. मध्यरात्री पणजीमध्ये यानिमित्त काही ठिकाणी दारूकामाची आतषबाजीही करण्यात आली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने आली असली तरी गोमंतकीयांनी नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. कित्येक ठिकाणी मध्यरात्री 11 वा. 59 मि. वीज दिवे बंद केले आणि 00 वाजता म्हणजेच 12 वा. दिवे लावून नूतन वर्षाचे स्वागत केले. यावर्षी विदेशी पर्यटकांची संख्या अत्यल्प आहे.
निवडणूक वर्ष अशल्याने राजकारण गाजणार
नूतन 2021 हे वर्ष निवडणूक वर्ष मानले जाते. या वर्षाअखेरीस 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल व आचारसंहिताही लागू होईल. प्रत्यक्षात फेब्रु. 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी देखील हे संपूर्ण वर्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असंख्य राजकीय घडामोडींचे जाणार आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आगामी निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी वर्षभर कार्यक्रम व योजना आखणार आहे. त्याचबरोबर छोटय़ा मोठय़ा सभाही सुरू होणार आहेत. दिल्लीतील अनेक राष्ट्रीय पक्षांचे नेते वर्षभरात अनेक वेळा गोव्यात येऊन जातील.
हिरक महोत्सव समाप्तीला पंतप्रधान येण्याची शक्यता
गोवा मुक्तीदिनाच्या हिरक महोत्सवी वर्षाला म्हणजेच दि. 19 डिसें. 2020 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येऊन गेले. 19 डिसें. 2021 रोजी समारोप समारंभानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मार्चमध्ये होणार पालिका, महापालिका निवडणूक
आगामी निवडणुकीपूर्वी आता मार्चमध्ये गोव्यातील 11 नगरपालिका व पणजी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. तिथेही सत्ताधारी भाजपची कसोटी पणाला लागेल. काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्षही लवकरच निश्चित होईल. आप नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही गोव्यात येतील. गोव्यातील सर्वात प्राचिन व सुरूवातीपासून गोव्याच्या राजकारणात टीकून राहिलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची निवडणूक याच महिन्यात होईल व तिचा नवा अध्यक्ष देखील निवडला जाईल.
अनेक राजकारणी मारणार उडय़ा?
आगामी निवडणुकीवर लक्ष ठेऊन अनेक राजकीय नेते जनतेने धक्का देण्या अगोदर आपण स्वतः जनतेला धक्का देत पक्षांतरे करणार आहेत. भाजपने आगामी निवडणुकीसाठी आतापासून सर्वत्र जोरदार तयारी सुरू केली आहे. गोवा फॉरवर्ड सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर लक्ष ठेऊन आहेत. ’आप’ गोव्यात विधानसभेसाठी खाते उघडण्याच्या तयारीत सज्ज होणार आहे. मतदारांना खूष ठेवण्यासाठी सरकार कोणत्या योजना राबविणार याकडे साऱयांचे लक्ष आहे.
वर्षभरात 10 हजार सरकारी नोकऱया !
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जि.पं. निवडणुकीपूर्वी राज्यातील युवकांना 10 हजार सरकारी नोकऱया देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आता या महिन्यापासून होईल. युवा वर्गासाठी आता सुवर्णसंधी प्राप्त होईल. विविध सरकारी खात्यात अनेक पदे रिक्त आहेत ती भरण्याचे काम यावर्षात केले जाणार आहे. त्यामुळे यंदाचे हे वर्ष केवळ निवडणूक वर्ष असेच नव्हे, तर 10 हजार सरकारी नोकऱयांचे वर्ष असेही म्हणावे लागेल. राज्यात मोठय़ा प्रमाणात असलेली बेकारी या निमित्ताने कमी होईल. पोलिस खात्यात सुमारे 2 हजार पदे भरावयाची आहेत. लेखा, सचिवालय, मजूर, उद्योग, सहकार, सा.बां. खा., शिक्षण, उच्च शिक्षण, कृषी, जलस्त्रोत, आरोग्य विशेषतः गोमेकॉ इत्यादी अनेक खात्यांमध्ये 10 हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होऊन ऑक्टो.-नोव्हें.पर्यंत ती पूर्ण केली जाणार आहे.