महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा इशारा
प्रतिनिधी / खेड
शासनाच्या बेजबाबदार कार्यशैलीमुळे राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदारांची काळी दिवाळी साजरी होणार आहे. शासनाच्या निषेधार्थ २५ नोव्हेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे. राज्यमंत्री मंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
गेल्या ८ महिन्यांपासून राज्यातील कंत्राटदारांची देयके प्रलंबित आहेत. नोव्हेंबर २०१९ पासून राज्यातील कंत्राटदारांची सर्व विभागाकडील देयके प्रलंबित आहेत. मार्चपासून सुरू झालेल्या कोरोनाचे कारण पुढे करून जाणीवपूर्वक छोट्या मोठ्या कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांची देयके देण्यासाठी निधीच दिला नाही. यामुळे राज्यातील कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांसह कुटुंबाची वाताहतच सुरू झाली आहे.
मार्च महिना हक्काची देयके देण्याचा काळ असताना देखील त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. शासनाने नोव्हेंबर २०१९ नंतर व जून २०२० याकालावधीत ८ महिन्यानंतर कंत्राटदारांना त्यांच्या देयकापोटी फक्त ५ ते ८ टक्के रक्कम दिली असून कंत्राटदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. एकीकडे छोट्या – मोठ्या कंत्राटदारांची उपासमार सुरू असताना दुसरीकडे मात्र मोठ्या कंपन्यांच्या कामांना शासन निधी देत असून ही चेष्टाच असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
राज्यातील कंत्राटदारांची देयके दिवाळीपूर्वी दिली न गेल्यास २५ नोव्हेंबरपासून सर्वप्रथम स्थानिक स्तरावर कामबंद आंदोलन छेडण्यात येईल. शासकीय कार्यालयास कुलूप लावून ठिय्या आंदोलन, उपोषण करण्यात येईल. ज्या विभागांचे मंत्री आहेत त्यांच्या स्थानिक घरासमोरही आंदोलन करण्यात येणार असून राज्य मंत्रीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.