नवी दिल्ली
संयुक्त जनता दलाचे नेते हरिवंश सिंह यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापतिपदी निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात राजदचे उमेदवार आणि खासदार मनोज झा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी सोमवारी निवडणूक पार पडली. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनी आपले उमेदवार दिले होते. रालोआकडून पुन्हा एकदा संजद नेते हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी मिळाली होती. हरिवंश यांच्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. एक पत्रकार, एक समाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. सदनात ते कशाप्रकारे काम करतात ते आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध आहेत. यापूर्वीही त्यांनी सदन सांभाळलेले आहे. येत्या काळातही ते त्यांची भूमिका अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडतील याची मला खात्री वाटते, असे पंतप्रधान म्हणाले.