पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त जनता दलाचे राज्यसभा खासदार आणि उद्योगपती महेंद्र प्रसाद यांचे नवी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. निधनासमयी ते 81 वर्षांचे होते. प्रसाद यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतल्याचे संयुक्त जनता दलाकडून सोमवारी सांगण्यात आले.
संसदेच्या धनाढय़ खासदारांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे प्रसाद हे बिहारमधून 7 वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. तसेच एकदा लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला होता. उद्योगजगतातील दिग्गज चेहरे असलेल्या प्रसाद यांनी अरिस्टो फार्मास्यूटिकल्सची स्थापना केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रसाद यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राज्यसभा खासदार डॉ. महेंद्र प्रसाद यांच्या निधनाने दुःखी आहे. त्यांनी अनेक वर्षांपर्यंत संसदेत प्रतिनिधित्व केले आणि अनेक सामुदायिक सेवाकार्यांमध्ये त्यांचा पुढाकार राहिला होता. प्रसाद यांनी नेहमीच बिहार आणि तेथील लोकांच्या कल्याणाचा मुद्दा मांडला होता असे मोदींनी नमूद पेले आहे. प्रसाद यांचे निधन समाज, राजकारण आणि उद्योगजगतासाठी मोठी हानी असल्याचे उद्गार नितीश कुमार यांनी काढले आहेत.
प्रसाद सर्वप्रथम 1980 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले होते. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिल्यावर प्रसाद यांनी नंतर राष्ट्रीय जनता दल आणि त्यानंतर संयुक्त जनता दलात प्रवेश केला होता. प्रसाद यांच्या नावापूर्वी ‘किंग’ हा शब्द लावला जात होता.