बानगीत्ती गुडीहाळमधील स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बानगीत्ती गुडीहाळ येथे कर्नाटक राज्य कुस्ती संघ बेंगळूर व धारवाड जिल्हा कुस्ती संघ धारवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय पुरूष व महिला कुस्ती स्पर्धेत हलगा बस्तवाडची महिला मल्ल लक्ष्मी संजय पाटील हिने 57 किलो वजनी गटात गदगच्या श्वेताचा पराभव करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.
कलघटगी येथील बानगीत्ती गुडीहाळ येथे कर्नाटक राज्यस्तरीय पुरूष व महिलांसाठी मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हलगा बस्तवाडच्या लक्ष्मी पाटीलने पहिल्या फेरीत गदगच्या राधिकावर चितपट विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात लक्ष्मीने गदगच्या श्वेताचा 6 मिनिटात 5-1 अशा गुणफरकाने पराभव करून या गटातील विजेतेपद पटकाविले. तिला मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, आकर्षक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. लक्ष्मी पाटील ही युवजन क्रीडा खाते हल्याळ येथे सराव करीत असून, तिला कुस्ती प्रशिक्षक तुकाराम गौडा यांचे मार्गदर्शन तर वडील संजय पाटील व आई मलप्रभा पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.