भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांचा ऑडिओ व्हायरल
प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्रिपदावरून येडियुराप्पा पायउतार होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांचा ऑडिओ व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मंत्री जगदीश शेट्टर व मंत्री के. ईश्वरप्पा यांच्या गटालाही धक्का बसण्याची शक्यता या ऑडिओमधून स्पष्ट झाली आहे. प्रदेशाध्यक्ष कटिल हे आपल्या निकटवर्तीयांशी बोलतानाचे संभाषण व्हायरल झाले आहे.
येडियुराप्पा दिल्ली दौऱयावर गेले होते. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. या भेटीनंतर शनिवारी ते बेंगळूरला परतले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले होते. मात्र, आता नलिनकुमार कटिल यांचे मुख्यमंत्री बदलाचे संभाषण व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आगामी मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार याबाबत उत्सुकता आहे.
कटिल यांचा ऑडिओ व्हायरल झाल्याने शेट्टर व के. ईश्वरप्पा यांच्या गटालाही धक्का बसण्याची शक्मयता आहे. कटिल यांनी याबाबत कोणालाही माहिती न देण्याची सूचना निकटवर्तीयांना करत असल्याचे ऑडिओतून समोर आले आहे. त्याचबरोबर आम्ही सांगेल तसेच राज्यात बदल होणार असून मुख्यमंत्रिपदासाठी तीन नावे निश्चित केली आहेत, असेही त्यांनी म्हटल्याचे समजते. त्यामुळे भाजपमध्ये फेरबदल होणार असल्याचे समजते.