दोडामार्ग – वार्ताहर-
राज्य तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणावी अशी मागणी राज्य व जिल्हा कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली.
खा. राऊत यांची सिंधुदुर्ग जिल्हा कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी मध्ये समावेश करून ५० ते ६० वर्षापासूनचा अन्याय दूर करावा. व राज्यातील कोतवालाना न्याय द्यावा. तसेच सदर विषयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणावी अशी विनंती खासदार राऊत यांच्याकडे केली. यावेळी लवकरच मुख्यमंत्री यांना भेटून हा विषय मार्गी लावून राज्यातील कोतवालांना न्याय देऊ असे आश्वासन खासदार राऊत यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. खासदार राऊत यांनी भेट घेताना शिवसेनेचे कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये, राज्य कोतवाल संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख तथा दोडामार्ग तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष बाळू झोरे, यांसह शेखर बोर्डेकर, गणेश गोसावी, अशोक राणे, रोशन वरक आदी उपस्थित होते.