शुक्रवारी 445 नवे रुग्ण : 10 जणांचा बळी : 246 संसर्गमुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गबाधितांचा आकडा मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. शुक्रवारी राज्यात 445 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये बेंगळूरमधील अधिक जणांचा समावेश आहे. बेंगळूर शहरात मागील 10 दिवसांपासून दररोज शंभरपेक्षा अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे येथील एकूण रुग्णसंख्या 2 हजाराजवळ पोहोचली आहे. दुसरीकडे राज्यातील रुग्णसंख्या 11 हजार पार झाली आहे. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये 10 रुग्णांचा बळी गेला आहे.
राज्यात कोरोनाचा आलेख चढताच आहे. राज्यात आतापर्यंत 11,005 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 6,916 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 3,905 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील 178 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. शुक्रवारी 246 जण संसर्गमुक्त झाले. तर बेंगळूर शहर जिल्हय़ात 3 आणि बागलकोट, कोलार, धारवाड, शिमोगा, बिदर, गुलबर्गा, बळ्ळारी जिल्हय़ात प्रत्येकी एक असे एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 180 वर पोहोचला आहे.
मागील 24 तासांत बेंगळूर शहर जिल्हय़ात 144, बळ्ळारीत47, गुलबर्गा 42, कोप्पळ 36, मंगळूर 33, धारवाड 30, रायचूर 14, गदग 12, चामराजनगर 11, उडुपी 9, यादगिर 7, मंडय़ा, कारवार, बागलकोट, शिमोगा, कोलारमध्ये प्रत्येकी 6, म्हैसूर 5, चिक्कमंगळूर व कोडगूमध्ये प्रत्येकी 4, हासन व बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात प्रत्येकी 3, विजापूर व तुमकूरमध्ये प्रत्येकी 2 तसेच बिदर, बेळगाव दावणगेरे, रामनगर, चित्रदुर्गमध्ये प्रत्येकी 1 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यातील 65 जण परराज्यातून तर 21 जण विदेशातून आलेले आहेत.
बागलकोटमधील डॉक्टराचा बेंगळूरमध्ये मृत्यू
जीवघेण्या कोरोनामुळे बागलकोट जिल्हय़ातील डॉक्टराचाही बळी गेला आहे. बागलकोटमधील कलादगी येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणाऱया 30 वर्षीय डॉक्टरावर बेंगळूरमधील फोर्टिस इस्पितळात उपचार करण्यात येत होते. सदर डॉक्टराला. श्वसनाचा त्रास जाणवू लागण्याने इस्पितळत दाखल करण्यात आले होते. त्याची मूत्रपिंडेही अकार्यक्षम बनली होती. दरम्यान, त्याच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. बेंगळूरमध्येच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. युवा डॉक्टराच्या निधनाबद्दल बागलकोट जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनंत देसाई यांनी शोक व्यक्त केला आहे.