विट्यात मराठा क्रांती मोर्चाचे प्रातिनिधिक आंदोलन
प्रतिनिधी / विटा
मराठा आरक्षण प्रश्नी आलेला निकाल निराशा करणारा आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एकत्रित करून राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आवश्यक प्रयत्न करणार आहे, असे मत खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल दिला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तहसीलदार कार्यालय विटा येथे आंदोलन करण्यात आले. कोरोना संदर्भात नियम पाळून प्रतिनिधिक स्वरूपात प्रशासकीय इमारतीच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्यासह सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार संजयकाका पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदार ऋषिकेत शेळके याना निवेदन देण्यात आले.
लवकरच महाराष्ट्रातील खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री याना भेटणार आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे. सध्या कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे आपण सर्वानी संयम ठेवावा. सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू, असेही खासदार पाटील म्हणाले.
यावेळी शंकर मोहिते म्हणाले, न्यायालयाच्या निकालाने आमची निराशा झाली आहे. आज कोरोनाची परिस्थिती असल्याने आम्ही प्रातिनिधिक आंदोलन केले आहे. मात्र कोरोनाचे संकट संपल्यावर मात्र आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा शंकर मोहिते यांनी दिला. विजय पाटील,महेश बाबर, दहावीर शितोळे, सुधीर बाबर, विकास जाधव, विनोद पाटील, रोहित पवार, सिद्धांत पाटील उपस्थित होते.