मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा निर्धार, ड्रग्सप्रकरणी कोणाचीही गय नाही
पणजी /प्रतिनिधी
राज्यातील गुंडगिरीचा पूर्णपणे बिमोड केला जाईल, असा निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. त्याचबरोबर सर्व गुंडांना त्वरित आत टाका, असे आदेशही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पोलीस अधिकाऱयांना दिले आहेत. राज्यातील ड्रग्स प्रकरणात कोणीही कितीही मोठा असला तरीदेखील आपण त्याची गय करणार नाही व त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच पोलिसांना पूर्ण अधिकार देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली .
पोलीस अधिकाऱयांशी उशिरापर्यंत चर्चा
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस अधिकाऱयांशी चर्चा करून गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. नंतर ‘तरुण भारत’शी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपण सर्व पोलीस अधिकाऱयांशी सायंकाळी उशिरापर्यंत चर्चा केली व राज्यात कोणत्याही परिस्थितीत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही जे-जे कोणी गुंड असतील त्यांची सखोल चौकशी करा व त्वरित त्यांची कोठडीत रवानगी करा, असा आदेश दिला.
मडगाव प्रकरणानंतर प्रथमच असा कडक पवित्रा घेण्यास मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱयांना भाग पाडले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मडगाव प्रकरणी सोळा तासात राज्य पोलिसांनी संबंधित गुंडांना अटक करून त्यांची कोठडीत रवानगी केली त्याचबरोबर शनिवारी सायंकाळी या प्रकरणातील आणखीन एक खतरनाक गुन्हेगार त्यालाही पणजीच्या गुन्हा अन्वेषण विभागाने शिताफीने अटक करून त्याची कोठडीत रवानगी केली. आपल्या कारकिर्दीत गुंडगिरीला आळा बसला आहे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मुळीच निर्माण झालेला नाही उलटपक्षी जनतेत आता जागृती निर्माण झालेली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
तीन कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
आपण सत्तेवर आल्यानंतर प्रथमच पोलीस यंत्रणेने तीन कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. मेरशी प्रकरणी आतापर्यंत 18 गुंडाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून यातील कोणताही गुन्हेगार सुटणार नाही याची दक्षता पोलीस खाते घेईल. गृह खात्याने यासंदर्भात फारच कडक पावले उचललेली आहेत आपण जनतेला विनंती करतो की, त्यांनी राज्य सरकारला सहकार्य करावे. ड्रग्स प्रकरण असो गुंडगिरी असो किंवा महिलांवरील अत्याचार प्रकरण असो सरकार कोणाचीही गय करणार नाही. राज्यातील ड्रग्समाफिया यांच्याविरुद्ध देखील कडक कारवाई केली जाईल. हातात बंदुका तलवारी घेऊन फिरणाऱयांना आतमध्ये बसावे लागेल. आपण यासंदर्भात शनिवारी सायंकाळी डीजीपी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, गुन्हा अन्वेषण विभाग व अन्य अधिकाऱयांशी चर्चा केलेली आहे. राज्यातील ड्रग्स प्रकरणात कोणीही असो आपण कोणाचीही गय करणार नाही आणि यामध्ये कोणीही सहभागी झालेला असेल त्यासंदर्भातील माहिती एक तर आपल्याकडे द्यावी अन्यथा पोलिसांना पूर्ण माहिती द्यावी. राज्याचे गुन्हे अन्वेषण विभाग तसेच अमलीपदार्थ विरोधी पथक कडक कारवाई करील, असा इशाराच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.