अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक,
पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्या-बढत्या पडल्या लांबणीवर
राजेंद्र होळकर / कोल्हापूर
राज्याच्या गृह खात्याने काही दिवसापूर्वी राज्यातील पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अतिवरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्या झालेल्या पोलीस अधिकार्यांनी पदभार देखील स्विकारला आहे. या बदल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या होतील, असे पोलिसांच्यात बोलले जात होते. पण मराठा आरक्षणवरुन सध्या राज्यात तापत असलेल्या वातावणाची दखल घेवून या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या महिना अखेरपर्यत करु नये, अशी भुमिका राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतल्याची माहिती सुत्राकडून समजली आहे.
तसेच या सर्व बदल्याचा परिणाम पोलीस उपनिरीक्षकांच्यापासून ते पोलीस अधीक्षक पदापर्यतच्या बढत्यावर झाला असून, या बढत्या देखील रखडल्या आहे. या रखडलेल्या प्रमोशनच्या यादीकडे पोलीस दलाचे लक्ष लागून राहिले आहे. कोरोना ससंर्गजन्य विषाणूच्या महामारीमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याने त्याचा मोठा ताण प्रशासकीय कामावर झाल्याने, कोरोना नियंत्रणात येवून, राज्याची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पोलीस अधिकार्यांच्या बदल्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या गृह विभागामध्ये बोलले जात असल्याने एप्रिल महिन्यात होणार्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या गेल्या पाच महिने लांबणीवर पडल्या.
अखेर पुढे ढकलण्यात आलेल्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्याना गेल्या महिन्यात मुर्हुत निघाला. पण पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी गणेशोत्सव व मोहरम सण पार पडे पर्यत पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करु नये, अशी भुमिका घेतली. याच दरम्यान दहा पोलीस आयुक्ताच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. यावर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एक वादळ उठले. काही तासाच्या कालावधीत झालेल्या सर्व बदल्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर दोन दिवसानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या झालेल्या त्या दहा आयुक्तत्यांच्या रितसर बदल्या केल्या.
त्यानंतर चौदा दिवसापूर्वी गृह खात्याने पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या सुमारे 45 पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करुन, बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ हजर राहुन, पदभार स्विकारा असे बदली आदेशात नमुद केले. त्यानुसार बदली झालेल्या सर्वच पोलीस अधिकार्यांनी बदलीच्या ठिकाणी हजर राहून पदभार स्विकारला व प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात ही केली आहे. या बदल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या त्वरीत बदल्या केल्या जातील, अशी पोलीस दलात चर्चा केली जात होती. या दर्जाच्या पोलीस अधिकार्यांच्या पैकी बहुताश सर्वच अधिकार्यांचा सध्या नोकरी करीत असलेल्या ठिकाणचा कार्यकाळ समाप्त देखील झाला आहे. या दर्जाच्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर करण्यात येणार होत्या. पण याच दरम्यान राज्यात मराठा आरक्षण मागणीवरुन वातावरण तापू लागले आहे. याची गृह खात्याने गांभीर्याने दखल घेवून, अतिरिक्त पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कराव्यात, अशी गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे या पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांना महिना अखेरपर्यत ब्रेक देण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांकडून समजली आहे.
कनिष्ठ पोलीस अधिकायांच्याही बदल्या रखडल्या
पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या राज्याच्या पोलीस महासंचालकांच्याकडून करण्यात येतात. मात्र अतिरिक्त पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्यांना ब्रेक लागल्याने पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या सुध्दा रखडल्या गेल्या आहेत.