१२० अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेच्या नौकांना मिळणार डिझेल कोटा
मालवण/प्रतिनिधी –
सिंधुदुर्गसह राज्याच्या किनारपट्टीवरील १२० अश्वशक्ती पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या ट्रॉलरना अनुदानित डिझेल कोटा व थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या पुढाकारातून मालवण व देवगड येथील मच्छीमार शिष्टमंडळाने मंगळवारी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती १२० अश्वशक्तीपेक्षा इंजिन क्षमता ट्रॉलरना अनुदानित डिझेल कोट्यात समावेश करून त्यांना मागील अनुदानित थकबाकीही दिली जाणार असल्याची ग्वाही मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. अशी माहिती बैठकीस उपस्थित मालवणचे मच्छीमार प्रतिनिधी संतोष खांदारे यांनी दिली. यावेळी देवगड येथील जगन्नाथ कोयंडे, कृष्णा परब, धनंजय जोशी, बाबी तेली यासह देवगड नवनिर्वाचित नगरसेवक संतोष तारी हेही उपस्थित होते.