केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने निर्णय
वार्ताहर/ हुबळी
29 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. दरम्यान, 30 जानेवारीला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविण्यात आली असून 1 फेबुवारीला अर्थमंत्री निर्मला सीताराम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमिवर कर्नाटकातील विविध विकासकामासंबंधी मागण्यांची यादी केंद्राकडे पाठविणार नाही, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. हुबळी रेल्वे स्थानकावर पहिल्या प्लॅटफॉर्मवर रविवारी आयआरसीटीसीच्या ‘फुड इन व्हेज अँड नॉनव्हेज’ रुमचे उद्घाटन करून ते बोलत होते.
मंत्री प्रल्हाद जोशी पुढे म्हणाले, 16 आणि 17 जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय वरिष्ठ नेते राज्य दौऱयावर येत आहेत. 16 रोजी बेंगळूरत गृहखात्यातर्फे आयोजिलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर 17 रोजी बेळगाव येथील जनसेवक मेळाव्यात अमित शाह सहभागी होऊन भाषण करणार आहेत. मुख्यमंत्री येडियुराप्पा दिल्लीला गेले असून राष्ट्रीय नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेतील. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख वरिष्ठ नेतेच ठरवतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार शंकर पाटील मुनेनकोप्प, नैत्य रेल्वे प्रधान व्यवस्थापक ए. के. सिंग, डीआरएम अरविंद, कॅन्टीन मालक दिनेश सिंग तोमर, उमेश दुशी, डॉ. एम. नागराज, इस्ररुद्दीन मंगळूर आदी उपस्थित होते.