राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांची माहिती, विविध प्रलबिंत मागण्यांसाठी आंदोलन
प्रतिनिधी / मिरज
चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 27 ते 29 जानेवारी या दरम्यान राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यभरातील सुमारे साडेतीन लाख चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून काम करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाने राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 27 ते 29 जानेवारी या कालावधीत राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. पहिल्या दिवशी 27 रोजी काळ्या फिती लावून कामकाज, दुसऱ्या दिवशी 28 रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत निदर्शने आणि आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी 29 जानेवारी रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरातील सुमारे साडेतीन लाख चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर जाणार आहेत, असे भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले.