प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीत देखील राज्यातील 10 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. काही ठिकाणी सकाळच्या वेळेत मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी संथगतीने मतदान झाले.
बळ्ळारी महानगरपालिकेच्या 39 वॉर्डांमध्ये तर रामनगर आणि चन्नपट्टण नगरपालिकेच्या प्रत्येकी 31 वॉर्डांसाठी मतदान झाले आहे. सकाळी 7 पासून मतदानाला प्रारंभ झाला. शिमोगा जिल्हय़ातील भद्रावती नगरपालिका, मडिकेरी नगरपालिका, गुडिबंडे नगरपंचायत, बिदर नगरपालिकेसाठीही मतदान झाले. याशिवाय हावेरी जिल्हय़ातील हिरेकेरुर नगरपंचायत आणि बिदर जिल्हय़ातील हळ्ळीखेड नगरपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली.
मडिकेरी नगरपालिकेसाठी सायंकाळी 6 पर्यंत 70 टक्के मतदान झाले होते. येथे 7 वर्षांनंतर नगरपालिकेच्या 23 वॉर्डांसाठी मतदान झाले. त्याकरिता 27 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. बिदर नगरपालिकेच्या निवडणुकीत सायंकाळी 5 पर्यंत 48.09 टक्के मतदान झाले होते. येथे सकाळी 11 नंतर जलदगतीने मतदान झाले. दुपारी 1 पर्यंत 30 टक्के मतदान झाले होते.
कोरोना परिस्थितीमुळे राज्य निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंदांवर कोविड मार्गसूचीनुसार सुरक्षा व्यवस्था केली होती. कोरोनाबाधित मतदारांनी देखील सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पीपीई किट परिधान करून मतदानाचा हक्क बजावला.