गौरव गुप्ता बेंगळूर मनपाचे नवे आयुक्त : मंजुनाथ प्रसाद यांची उचलबांगडी
प्रतिनिधी / बेंगळूर
प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी बुधवारी राज्य सरकारने 16 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. बेंगळूर महापालिकेच्या नूतन आयुक्तपदी गौरव गुप्ता यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर या पदावरील मंजुनाथ प्रसाद यांची बदली महसूल खात्यामध्ये करण्यात आली आहे. गुप्ता यांच्यावर वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेंगळूर मनपाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून राकेश सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बेंगळूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मंजुनाथ प्रसाद यांची महापालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी करून महसूल खात्याच्या मुख्य सचिवपदी बदली केली आहे.
ऊर्जा खात्याचे अप्पर मुख्य सचिव जी. कुमार नायक यांच्यावर उच्च शिक्षण खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदाची अतिरिक्त धुरा सोपविण्यात आली आहे. पायाभूत सुविधा विकास खात्याचे अप्पर मुख्य सचिव कपील मोहन, कर्नाटक सार्वजनिक भू निगमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. एन. गोपालकृष्ण यांच्यावर आयटी-बीटी खात्याच्या संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर राज्य ग्रामीण पायाभूत निगमचे व्यवस्थापक संचालक जी. एम. गंगाधरस्वामी यांच्यावर राज्य विद्युत प्रसारण निगमच्या व्यवस्थापक संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
वाणिज्य व उद्योग खात्यावर सचिव पंकजकुमार पांडे, कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याच्या सचिवपदी व्ही. पोन्नराजू, पर्यटन खात्याच्या संचालकपदी सिंधू बी. रुपेश, खाण-भूविज्ञान खात्याच्या संचालकपदी एस. होन्नांब, सकाल मिशनच्या अतिरिक्त योजना संचालकपदावर डॉ. बी. आर. ममता यांची बदली झाली आहे.