प्रतिनिधी / बेंगळूर
हेलिटुरिझमचा विकास साधण्यासह देश-विदेशातील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील सहा ठिकाणी हेलिपोर्ट उभारण्यात येत आहेत, अशी माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री सी. पी. योगेश्वर यांनी दिली. मंगळवारी गुलबर्गा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
मंत्री योगेश्वर पुढे म्हणाले, गुलबर्गा, हुबळी, हंपी, म्हैसूर, बेंगळूर आणि मंगळूर येथे विमानाद्वारे होणारी हवाई वाहतूक जास्त असल्याने प्राथमिक टप्प्यात याठिकाणी पर्यटन खात्याकडून हेलिपोर्टचा विकास साधला जात आहे. तीन-चार एकर जागेत याची स्थापना केली जाणार असून प्रत्येक हेलिपोर्टकरिता 10 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री योगेश्वर यांनी गुलबर्गा येथे हेलिपोर्ट स्थापण्याबाबत आमदारांशी चर्चा करून 15 दिवसांत जमीन उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकारी व्ही. व्ही. जोत्स्ना यांना केली आहे. सहा ठिकाणी एएआय विमानतळ आणि इतर खासगी हेलिपॅडचा उपयोग करून पुढील दोन-तीन महिन्यांत हेलिकॉप्टर उड्डाणास प्रारंभ केला जाणार आहे. याचबरोबर प्रमुख पर्यटनस्थळी हेलिपॅड स्थापण्यात येणार आहे, असेही मंत्री योगेश्वर यांनी सांगितले.