कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाही : शिवानंद बांदेकर
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील सुमारे 70 टक्के अल्पवयीन मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या (सेरो इम्युनिटी) तयार झाली असल्याचे दिसून येत आहे. तसेच गोमेकॉत 90 टक्के बालरोगांसाठी आयसीयु विभाग तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सध्यस्थितीत कोरोनाची तिसरी लाठ आली तर गोवा सरकार तिला समर्थपणे सामोरे जाण्यास तयार असल्याचे गोवा सरकारची तज्ञ समिती व गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले आहे.
सत्तर टक्क्यांहून अधिक अल्पवयीन मुलांमध्ये सेरो इम्युनिटी वाढत असल्याने या मुलांना कोरोनाची बाधा होऊन त्याच्यातून ती पूर्णपणे बरी झालेली आहेत. त्यामुळे या मुलांना पुन्हा कोरोनाची बाधा होणे शक्य नाही. सध्याच्या स्थितीत कोरोना बाधितांची सख्या कमी असून सारा प्रकार आटोक्यात आहे, अशा परिस्थितीत तिसरी लाट आली तरीही तिचा परिणाम दुसऱया लाटे इतका परिणाम होणार नाही, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.
पर्यटकांनी जबाबदारीने वागावे
जे लोक गोव्यात पर्यटक म्हणून किंवा अन्य कारणासाठी येतात, त्यांनी जबाबदारीने वागावे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन डॉ. बांदेकर यांनी केले आहे. लोकांनी मास्कचा वापर करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन स्वतःच्या हितासाठी करावे. कोरोना बाधितांच्या संख्येवर आमचे लक्ष असून संख्या वाढत असल्याचे दिसून आल्यास त्वरित योग्य पावले उचलली जाणार आहेत.
प्रसंगी पर्यटन, कॅसिनो बंद होईल
आर्थिक परिस्थितीचा समतोल राखण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत काही प्रमाणात पर्यटन व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. पॅसिनोही सुरु करण्यात आले आहेत. मात्र प्रकार हातीबाहेर जात असल्याचे दिसून आल्यास पर्यटन व्यवसाय व पॅसिनो बंद करणे महत्वाचे ठरेल, असेही डॉ. बांदेकर म्हणाले.