बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी
प्रतिनिधी /पणजी
राज्यात आजपासून दिवाळी उत्सवाला जोरदार प्रारंभ होत आहे. या उत्सवावर पावसाचे सावट असले तरीही जनतेमध्ये या उत्सवाच्या स्वागतासाठी कमालीचा उत्साह संचारलेला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळपासून नरकासुरांच्या रंगीबेरंगी आक्राळविक्राळ अशा प्रतिमा उभारल्या जातील. अनेक ठिकाणी आकाशकंदील व नरकासुर प्रतिमांच्या आज रात्री उशिरापर्यंत स्पर्धा होतील व उद्या पहाटे नरकासुर प्रतिमांचे दहन केले जाईल.
दिव्यांचा उत्सव दीपावलीला गोव्यात आज सायंकाळपासूनच प्रारंभ होत असून जनतेत कमालीचा उत्साह संचारलेला आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी उसळलेली आहे. तर रस्त्यांवरही वाहनांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याने राज्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर ट्रफिक जामची परिस्थिती उद्भवली आहे. विविध चौका चौकात दिवाळीचे खास आकर्षण असलेल्या नरकासुर प्रतिमा उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्यावर अखेरचा हात फिरविण्यात बालगोपाळ मंडळी गर्क झालेली दिसली.
गोव्याच्या बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी व विविध आकाराचे आकाशकंदील विक्रीस आलेले आहेत. दिवाळीच्या फराळासाठी गावठी पोहय़ांना असलेली मागणी विचारात घेऊन मोठय़ा प्रमाणात गावठी पोहे विक्रीसाठी आलेले आहेत. दिवाळीच्या अगोदरच पेट्रोलचा दर प्रतिलिटर रु. 108 झाला आहे. डिझेलने 103 रु. दर ओलांडलेला आहे. तसेच बाजारात भाजीचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य माणूस महामारीने होरपळून निघालेला असताना दिवाळीच्या उत्साहामध्ये मात्र फरक पडलेला नाही. यंदा बहुतांश नागरिक हे मातीच्या पणत्यांचाच जास्त वापर करणार असल्याने मेणबत्ती व तत्सम दिव्यांची मागणी एकदमच कमी झाली आहे.