ज्येष्ठ, व्याधींनी ग्रस्त, 45 वर्षांवरील नागरिकांना देणार लस
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यभरात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व आघाडीच्या कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आता सोमवार दि. 1 मार्चपासून सर्वसामान्य जनतेसाठी कोविड लसीकरण सुरू होणार आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना आता कोरोनाची लस देण्यात येणार आहे. याचबरोबर विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या आणि कोविडचा अधिक धोका असलेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनाही सोमवारपासून लस देण्यात येणार आहे. यावेळी लसीकरणात शासकीय आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयांनाही सामील करण्यात येणार असून लसीकरणासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे.
तुमकूर जिल्हय़ातील शिरा येथे आजपासून सुरू होणाऱया लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर करणार आहेत. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात लसीकरण नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक जिल्हय़ातील सर्व तालुका आरोग्य केंद्र व परवानगी दिलेल्या दोन खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. बेंगळूर येथील सर्व प्रमुख आरोग्य केंद्र व बेंगळूर महापालिका व्याप्तीतील 18 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे.
आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या फळीतील कोरोना योद्धय़ांप्रमाणेच सर्वसामान्यांनादेखील कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस निवडण्याचा पर्याय असणार नाही. खासगी आरोग्य केंद्रामध्येही लस निवडण्याचा पर्याय दिला जाणार नाही. सरकारकडून पुरविण्यात येणारी लस ज्येष्ठ नागरिक, व्याधींनी ग्रस्त असलेल्या व कोविडचा धोका असलेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनाच देण्याची सूचना खासगी आरोग्य केंद्रांना देण्यात आली आहे. सध्या कोविशिल्ड लस देण्यात येणार असून ती सरकारकडून शासकीय व खासगी आरोग्य केंद्रांना पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे आयुक्त डॉ. के. व्ही. त्रिलोकचंद्र यांनी दिली.