प्रतिनिधी/ पणजी
राज्यात आज सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे. आजपासून चातुर्मासाला प्रारंभा होत आहे. आजची एकादशी ही देवशयनी एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे. विठ्ठलाचे मोठय़ा प्रमाणात भक्तजन राज्यात असून आज ते एका दिवसाचा उपवास करणार आहेत.
आज आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील सर्व विठ्ठल मंदिरांत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पणजी मळा, ताळगाव, रायबंदर, दिवाडी, कुंभारजुवे, माशेल, कोंब-मडगाव, केपे, सांखळी, मये, मांद्रे इत्यादी मंदिरांत आज पहाटेपासून श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक होईल. सकाळपासून अभिषेक व दुपारी श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा, आरत्या व दुपारी सर्व विठ्ठल मंदिरांत भजन, कीर्तनादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मुख्यमंत्री सांखळी येथे करणार महापूजा
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज सकाळी 7.30 वा. विठ्ठलापूर-सांखळी येथील श्री विठ्ठल मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक करणार आहेत. राज्यातील जनतेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देवशयनी महाएकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.