चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण 22.70 टक्के ; बुधवारी 229 रुग्णांचा बळी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून मंगळवारच्या तुलनेत 8 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील चोवीस तासांत 1,71,997 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण बुधवारी 22.70 टक्के इतके होते. मंगळवारी हेच प्रमाण 18.71 टक्के होते. बुधवारी राज्यात उच्चांकी 39,047 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. मंगळवारी राज्यात 31,830 रुग्ण आढळले होते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासांत 11,833 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर बुधवारी दिवसभरात 229 जणांना कोरोनाने मृत्यू झाला आहे. बळींचा आकडा वाढत असल्याने आरोग्य खात्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3,28,884 इतकी आहे. त्यापैकी 2,192 रुग्ण हे अतिदक्षता विभागातील आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 14,39,822 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 10,95,883 जण बरे झाले आहेत. तर एकूण 15,036 बाधितांचा बळी गेला आहे.
बेंगळुरात 2,24,152 सक्रिय कोरोना रुग्ण
बेंगळूरमध्ये कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला असून येथे बुधवारी तब्बल 22,596 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात बेंगळूरमध्ये 137 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. येथे उपचारातील रुग्णांचा आकडा धक्कादायक आहे. सध्या बेंगळूरमधील विविध इस्पितळांमध्ये आणि होम केअरमध्ये 2,24,152 रुग्ण उपचार घेत आहेत.
बेंगळूरमध्ये 3 हजार कोविड रुग्ण बेपत्ता
बेंगळूरमध्ये कोरोनाचा कहर झाला असून दिवसाला 18 हजारहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. दरम्यान, शहरातील 3 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता आहेत, अशी धक्कादायक माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली आहे.
स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण मोबाइल स्वीच ऑफ करत आहेत. बेंगळूरमधून बेपत्ता झालेले 3 हजार जण कोरोना संसर्गाचा फैलाव करत आहेत. त्यांचा शोध घेण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे. आपण राज्यातील जनतेकडे विनंती करत असून कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ताबडतोब उपचार करून घ्या. कोरोनाच्या अंतिम टप्प्यात जीवाला धोका निर्माण होईल इतकी तडजोड करू नका, असे आवाहन आर. अशोक यांनी केले आहे.