केंद्र सरकारची तत्वतः संमती : मंत्री जगदीश शेट्टर यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात उत्पादन होणाऱया वैद्यकीय ऑक्सिजनचा राज्यातच वापर करण्यास केंद्र सरकारने तत्वतः संमती दिली असून याबाबत लवकरच अधिकृत आदेश जारी होणार आहे, अशी माहिती अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली. विधानसौध येथे बुधवारी राज्यातील ऑक्सिजन उत्पादन आणि पुरवठा यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यात उत्पादन होणाऱया ऑक्सिजनचा वापर येथेच वापर करण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी केंद्रीयमंत्री पियुष गोयल, डी. व्ही. सदानंदगौडा आणि प्रल्हाद जोशी यांच्याशी अनेक वेळा चर्चा करण्यात आली होती. शिवाय अनेक पत्रे पाठविण्यात आली होती. या चर्चेला अखेर यश मिळाले असून राज्यात विविध ठिकाणी उत्पादन होणाऱया ऑक्सिजनचा वापर राज्यातच करण्यास केंद्र सरकारकडून तत्वतः संमती मिळाली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने बहरेन आणि कुवेतहून मिळालेले 180 मेट्रीक टन ऑक्सिजन कर्नाटकाला दिले आहेत. शिवाय रेल्वेद्वारे 11 मे रोजी जमशेदपूरहून 120 टन ऑक्सिजन पाठवून दिले होते. 15 मे रोजी कलिंगनगरहून 180 मे. टन ऑक्सिजन पाठविले आहे. पुढील आठवडाभरात 320 मे. टन ऑक्सिजन मिळणार आहे. याशिवाय राज्यातून तेलंगणाला पाठविण्यात येणारे 145 मे. टन, आंध्रप्रदेशला 63 मे. टन आणि महाराष्ट्राला पाठविण्यात येणारे 40 मे. टन ऑक्सिजन कर्नाटकातच वापरण्यास केंद्राकडून परवानगी मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
संबंधित जिल्हय़ांमधील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येच्या आधारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. राज्याला दररोज 1,400 ते 1,700 मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. मागील 7 दिवसांपासून दिवसाला सरासरी 880 मे. टन ऑक्सिजनचा वापर होत आहे. मंगळवारी राज्याला 66 मे. टन कमी ऑक्सिजन पुरवठा झाला, अशी माहितीही त्यांनी दिली.