बेंगळूर : कोरोना प्रतिबंधक लस देण्यात राज्याने विक्रम केला असून गेल्या 24 तासात 2.59 लाख जणांना लस देण्यात आली आहे. एकीकडे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना लस घेणाऱयांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यानुसार गेल्या 24 तासात लस वितरण करण्यात कर्नाटकाने विक्रम करीत तब्बल 2,59,439 लाख जणांना लस दिली आहे. तसेच लस देण्यात देशात पहिला क्रमांक मिळविला आहे.
याबाबत माहिती देताना आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी, शनिवारी रात्री 11 पर्यंत राज्यात एकाच दिवशी तब्बल 2,59,439 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. ही संख्या देशात सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दुसऱया स्थानावर असून त्याठिकाणी 2,35,690 लाख जणांनी लस घेतली आहे. तर तिसऱया स्थानी असलेल्या मध्यप्रदेशमध्ये 24 तासात 1,78,389 जणांना लस देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.