प्रतिनिधी / पणजी
राज्याच्या काही भागात रविवारी रात्री व सोमवारी सकाळी तुरळक पाऊस झाला. पणजीत सोमवारी पहाटे किंचित पाऊस पडला. फोंडा, माशेल, सत्तरीतील एक-दोन ठिकाणी तसेच बार्देश तालुक्यात व पेडणेतील दोन गावांमध्ये पावसाच्या तुरळक सरी झाल्या.
सध्या केरळ ते मध्य महाराष्ट्रा दरम्यान बाष्पाचा मोठा पट्टा आकाशात तयार झालेला आहे. त्याची गती सोमवारी वाढली. त्यामुळे गोव्यात, कर्नाटकात आणि महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाळी ढग तयार झाले. आगामी 24 तासांत गोव्यात काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडून जातील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामानाचा परिणाम म्हणून समुद्रही खवळलेला राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.