शुक्रवारी 26,962 नवे रुग्ण : चाचण्याही 1.77 लाखांवर
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाचा फैलाव सुरुच असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. गुरुवारप्रमाणेच शनिवारी देखील राज्यात विक्रमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये राज्यात 26,962 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी दिवसभरात 1,77,466 कोविड चाचण्या करण्यात आल्या. हा देखील दिवसभरातील सर्वाधिक चाचण्यांचा विक्रम आहे. चाचण्यांच्या तुलनेने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.19 टक्के इतके आहे.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने शुक्रवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 8,697 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर दिवसभरात 190 बाधितांचा बळी गेला आहे. दरम्यान, राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा दोन लाखांवर गेला आहे. सध्या विविध इस्पितळे, होम केअरमध्ये उपचार घेणाऱया बाधितांची संख्या 2,14,311 इतकी आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 12,74,959 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 10,46,554 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 14,075 जणांचा मृत्यू झाला आहे. बेंगळूर शहरातही कोरोनाचा कहर झाला आहे. शुक्रवारी बेंगळूर शहर जिल्हय़ात सर्वाधिक 16,662 कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे येथील इस्पितळे कोविड रुग्णांची भरली आहेत. तसेच तुमकूर जिल्हय़ात 1,004, बळ्ळारी जिल्हय़ात 695, बिदर 416, मंगळूर 485, धारवाड 472, कोलार 504, मंडय़ा 519, म्हैसूर 545, रायचूर 428, विजापूर जिल्हय़ामध्ये 429 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. उर्वरित जिल्हय़ातही रुग्णसंख्या वाढत आहे.